चौकशीच्या भीतीपोटी कागदी मिश्र रोपवनात वन प्रशासनाकडून नव्याने रोपे लावण्याचा प्रयत्न सुरू
हजारो झाडे लावण्यावर व जगवण्यावर लक्षावधी रुपये मागील चार वर्षात या ठिकाणी करण्यात आला आहे खर्च.
*मानोरा :* गिरोली वन वर्तुळातील सावरगांव कान्होबा वन बीट मधील कक्ष क्र. १३८ मधील ३० हेक्टर मिश्र रोपवनात २०२१-०२२ मध्ये शासनाने लाखो रुपये खर्च मंजूर केलेल्या मात्र प्रशासनाने हे लक्षावधी रुपये कागदावर खर्च करून लावलेली एकही रोपे जगवली नसल्याचा कागदी रोपवन घोटाळा उघडकीस आल्याने संभाव्य कारवाईच्या भीतीने वन विभागाने आता घाईघाईने पुन्हा रोप लागवड सुरू केली आहे, असा खळबळजनक आरोप खापरदरी येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश शामराव राठोड यांनी केला आहे.
याबाबत राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांचेसह वरिष्ठांना लेखी निवेदन दिले आहे.
दि.२६ जून ०२६ रोजी पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी ते गेले असता, मंदिराच्या पाठीमागे असलेल्या कक्ष क्र.१३८ मध्ये काही मजूर रोपे घेऊन जाताना दिसले. विचारणा केली असता, "सरकारी उजाड रोपवनात रोपे लावण्यासाठी जातोय" असे मजुरांनी सांगितल्याचे राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
*४ वर्षे रोपे वाढवण्यावर खर्च केलेला निधी गेला कुठे ?*
सदर कक्षात २०२१-२२ मध्ये 'भरीव वनीकरण' योजनेअंतर्गत ३० हेक्टरवर मिश्र रोपवन करण्यात आले होते. यासाठी प्र.मा.क्र. ७० व ६० दि.२३.०९.०२२ नुसार मोठा निधी खर्च झाडे जगवण्यावर वन प्रशासनाकडून करण्यात आला.
मात्र ४ वर्षांनंतर प्रत्यक्ष जागेवर एकही झाड जिवंत नसल्याचे आघाडीच्या सर्व वृत्तपत्रांनी पुराव्यासह उघडकीस आणले होते.
*आता अचानक जाग कशी आली?*
"जुने रोपवन कागदावरच होते, निधी लाटला गेला. बिंग कुठल्याने आता चौकशी लागेल या भीतीने वन प्रशासनाने घाईघाईने पुन्हा रोपे लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे," असा थेट आरोप जगदीश राठोड यांनी केला आहे. "ही रोपे जगवण्यासाठी लावली जात आहेत की, भविष्यातील चौकशीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
*निवेदनात काय मागणी?*
राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांना दिलेल्या निवेदनात ३ प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१. *सध्या कक्ष क्र. १३८ मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत रोप लागवड सुरू आहे , तालुक्यातील आणखी किती वर्तुळात अशी रोप लावणी सुरू आहे ?*
२. *कक्ष क्रमांक १३८ मध्ये एकूण किती संख्येत रोपे लावली जात आहेत?*
३. *ही रोपे जगवण्यासाठी आहेत की जुना घोटाळा लपवण्यासाठी, याचा खुलासा निवेदनाद्वारे मागण्यात आला आहे.*
या निवेदनाच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर आणि उपवनसंरक्षक वाशिम यांनाही पाठवल्या आहेत.
वृक्ष लागवड व जगवनुकीवरील मंजूर निधी ढापल्यावर ४ वर्षे दुर्लक्षित ठेवलेले सावरगांव कान्होबाचे रोपवन संभाव्य चौकशीची चाहूल लागताच अचानक हिरवे कसे होणार ? जुन्या ३० हेक्टर रोपवनाचा लाखो रुपयांचा निधी गेला कुठे, याचा हिशोब आधी द्या, अशी मागणी आता जोर धरू लागली असून नोकरी वाचविण्यासाठी वन प्रशासनाकडून जुन्या ठिकाणी नवीन रोपे लावण्याची ही सगळी धडपड केली जात असल्याच्या चर्चा यानिमित्ताने पंचक्रोशी तर रंगत आहे ज्याची दखल दैनिक विदर्भ मतदार ने घेतली आहे.
*सावरगांव कान्होबा वनबिटामध्ये सुरू असलेल्या वृक्षारोपणाप्रमाणेच इतर ठिकाणे सुद्धा तालुक्यात पावसाळ्यात रोपे लावली जातात अशी माहिती वनपाल शिरसाठ यांनी दिली.*

No comments:
Post a Comment