हरघर नल या जलजीवन मिशन योजनेच्या घोषवाक्याला घरघर.



पाण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची दाहीदिशा.


मानोरा - केंद्र सरकारची महत्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेची अंमलबजावणी मानोरा तालुक्यात ढेपाळली आहे. अनेक गावातील योजना अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही योजना दोन वर्षांपासून मृतावस्थेत पडली आहे.   

  तालुक्यात खापरदरी,शेंदुरजनाआढाव, आसोला खुर्द यासह अनेक गावांची ‘जलजीवन मिशन’  योजना मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी काही गावांची कामे  पूर्ण झाली आहेत. तर अनेक गावांतील कामे अपूर्ण आहेत. काही गावांत कामाला सुरुवातही झालेली नाही.  

 गावागावात नळ जोडणीचे उद्दिष्ट कागदावरच राहिले आहे. नळ बसवले, पण पाणी नाही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. ठेकेदारांनी अर्धवट काम सोडून दिल्याने आणि अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  

  योजनेची सुरुवात २०२१ मध्ये झाली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून कामाचा वेग मंदावला आहे. निधीअभावी आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे योजना रखडली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मुदतीतही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे.  स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही योजना कागदावरच राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment