रक्तदान शिबिर आयोजित करून ११ जणांचा वाढदिवस साजरा; श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडाचा प्रेरणादायी उपक्रम

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण

मूर्तिजापूर, दि. १ जुलै : श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने भक्तीधाम मंदिर, समता नगर (ज्ञानपीठ हायस्कूलजवळ), मूर्तिजापूर येथे ११ जणांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करत भव्य रक्तदान शिबिर व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

यावेळी विलासजी वानखडे (महाराष्ट्र चित्रपट महामंडळ विदर्भ प्रदेश व नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कोकणवाडी, मूर्तिजापूर), गोपालरावजी खंडारे (रामतीर्थ), हरीदासजी सावळे सर व सौ. हरिका सावळे मॅडम (माजी मुख्याध्यापक),अरुणभाऊ थोरात (संचालक, बालाजी फर्निचर), शुद्धधनजी खांडेकर (प्रॉडक्शन मॅनेजर, घाना – दक्षिण आफ्रिका), दिनेशजी बागडे (शिक्षक), डिंगाबरजी सरदार (होमगार्ड सैनिक), श्यामजी आठवे (पोलीस), विकासजी गवारे (होमगार्ड सैनिक) तसेच डॉ. अथर्वजी बोडें यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला नगरसेवक पंकजभाऊ कांबे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक कैलासभाऊ महाजन, समाजसेवक निलेशभाऊ वानखडे, रुग्णसेवक रवीभाऊ माडकर, समाजसेवक अशोकजी थोरात, प्रा. गोवर्धनजी इंगोले, ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी बेलाडकर, पत्रकार जोशी सर, सत्यनारायणजी तिवारी (स्वच्छता अभियान, मूर्तिजापूर), सोहनजी सरोवरे (सिंधू बँक व्यवस्थापक) तसेच मिराजी बोडें मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवस असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. मूर्तिजापूरमध्ये रक्तदान चळवळ प्रभावीपणे राबविणारे रवी माडकर, गजानन चव्हाण, विलास वानखडे, श्री पाटील कोल्हे आणि स्वप्नील जामनिक यांच्या कार्याचेही मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी रक्तदाते, छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री पाटील कोल्हे तसेच रक्तवीर पुरस्कार प्राप्त खंडारे सर यांचा संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पाटील कोल्हे, स्वप्नील जामनिक, विलास वानखडे, गजानन चव्हाण, वैभव वानखडे, इम्रानभाई, रंजित सिरसाट, महादेव इंगोले, सुनील खंडारे, ऋषिकेश वाघमारे आणि सुनील मालखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा चे अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment