शाळांमध्ये एका बुक स्टोअरची सक्ती थांबवा; प्रत्येक शाळेत किमान पाच बुक स्टोअर्सची यादी लावण्याची मागणी
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तीजापूर शहरातील इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, नोटबुक व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी एका विशिष्ट बुक स्टोअरची सक्ती केली जात असल्याचा आरोप साईराज मित्र मंडळाने केला आहे. या प्रकारामुळे पालकांची आर्थिक लूट होत असून विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
साईराज मित्र मंडळाने पंचायत समिती, मूर्तीजापूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत शासनाच्या जीआरनुसार प्रत्येक शाळेने किमान पाच बुक स्टोअर्सची नावे शाळेच्या फलकावर प्रदर्शित करावीत, जेणेकरून पालकांना आपल्या पसंतीच्या दुकानातून पुस्तके व साहित्य खरेदी करता येईल, अशी मागणी केली आहे.
निवेदनात काही शाळांनी एका बुक स्टोअरशी करार करून विद्यार्थ्यांना तेथूनच साहित्य घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे इतर बुक स्टोअर्सचे नुकसान होत असून पालकांनाही जादा दर मोजावे लागत असल्याचे म्हटले आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने सर्व शाळांना योग्य सूचना द्याव्यात, अन्यथा संबंधित शाळा व बुक स्टोअर्सविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही साईराज मित्र मंडळाने दिला आहे. यावेळी साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी चौहान उपाध्यक्ष दिनेश श्रीवास सुनील भोजगडिया विलास वानखेडे विलास नसले विष्णू लोडम शाम काकडे संतोष इंगोले. मोहम्मद इम्रान रमेश दर्याणी दिगंबर सदार मनोज आहेरवार या वेळी उपस्थित होते

No comments:
Post a Comment