महिला सक्षमीकरणाच्या दिशेने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण पाऊल


मनवेलपाडा तलाव येथे शिवशंभू महिला बचत गटाचा खाद्यपदार्थ स्टॉल सुरू

वसई-विरार | प्रतिनिधी

महिलांनी स्वबळावर उभे राहून उद्योजक बनावे आणि इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या उद्देशाने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) संचलित शिवशंभू उद्योग समूह यांच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील शिवशंभू महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मनवेलपाडा तलाव परिसरात खाद्यपदार्थांचा स्टॉल सुरू करण्यात आला. या स्टॉलची जबाबदारी प्रतिष्ठानच्या सदस्य रेखा सकपाळ आणि सौ. वैजयंता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास, स्वावलंबी बनण्यास आणि लघुउद्योगाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले.

स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिवाजी शेलार, कार्याध्यक्ष श्री. सागर शेलार, उपाध्यक्ष श्री. राजाराम कदम, सल्लागार श्री. अंकुश शेलार, प्रसिद्धी प्रमुख कु. ओमकार शेलार, तसेच श्री. बळीराम जाधव, ऋषिकेश कदम, रोशन जाधव आणि प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"स्वावलंबी महिला – सक्षम समाज" या ध्येयाने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, भविष्यातही अशा अनेक महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment