भाजपा शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे आक्रमक: महागांवमध्ये एचपी गॅस ग्राहकांची लूट आणि मनमानी कारभार; ग्राहकांना होतोय नाहक त्रास

 




महागाव: प्रतिनिधी अक्षय डोंगरे

महागांव येथील एचपी गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले असून, गॅस वितरणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांनी या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, एजन्सीच्या या गैरकारभाराचा तीव्र निषेध केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव येथील एचपी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना घरपोच गॅस सेवा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. केवळ काही विशिष्ट ठिकाणीच सेवा दिली जात असल्याने सामान्य ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्राहकांना गोदामावर जाऊन गॅस घेण्यासही मनाई केली जात असून, 'ओटीपी लवकर एक्सपायर होतो' असे बालीश कारण देऊन ग्राहकांची बोळवण केली जात आहे. इतकेच नव्हे, तर ऑनलाइन पेमेंट घेण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.

या अनागोंदी कारभारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकआणि दिव्यांग व्यक्तींना मोठ्या शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्या ग्राहकांकडे स्वतःची वाहने नाहीत, त्यांना गॅस मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एजन्सीकडून ग्राहकांकडून पैसे घेऊनही त्यांना अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. "एजन्सीची ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. तातडीने चौकशी करून ग्राहकांना सुरळीत आणि प्रभावी घरपोच सेवा मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी," असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आता जिल्हा प्रशासन या एजन्सीवर काय कारवाई करते, याकडे महागावच्या जनतेचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment