डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श; नितीन लालसरे यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी :-. गणेश ठाकरे लासलगाव
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर हा उपक्रम निश्चितच संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. डोंगरगाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने उभारलेला हा शिक्षणाचा पॅटर्न राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे यांनी केले.
लालसरे यांनी निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, डोंगरगाव येथे त्यांनी सदिच्छा भेट देऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. शाळेतील खुशी आणि ईश्वरी या विद्यार्थिनींनी परदेशी भाषांमध्ये त्यांचे स्वागत केले, तर विद्यार्थी सहकारी बँकेच्या बाल व्यवस्थापकांनी बँकेच्या कामकाजाची माहिती सादर केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लालसरे यांनी स्वतःचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला. दहावीत इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतरही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत इंग्रजीचे प्राध्यापक झालो. त्याच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे मुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून मोठी स्वप्ने पाहावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी त्यांच्या कन्येच्या नावाने स्थापन केलेल्या 'राहा लालसरे फाउंडेशन' च्या माध्यमातून डोंगरगाव शाळेला आवश्यक शैक्षणिक साहित्य व विकासकामांसाठी मदत देण्याची घोषणा केली. तसेच शाळेच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे डोंगरगाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून, परिसरातून शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment