धीरज परदेशी हत्या प्रकरण: उपचारादरम्यान मृत्यू, हैदराबादमधून तिघांना अटक तर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
दर्पण न्यूज अहिल्यानगर (प्रतिनिधी):शरद धाडगे
अहील्यानगर शहर परिसरातील मुकुंदनगर येथे महापालिकेचे काम करत असताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग राजपूत (परदेशी) यांची तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये नागरिकांमधून व महापालिका कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले धीरज परदेशी (वय २० ते २५) हे मुकुंदनगर परिसरातील दर्ग्याजवळ विजेच्या खांबावरील दिव्यांची दुरुस्ती करत होते. यावेळी झालेल्या वादातून काही जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात धीरज यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तपास वेगाने सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने तेलंगणातील हैदराबाद येथे पळून गेल्याचे समोर आले. LCB पथकाने तेलंगणा पोलिसांच्या मदतीने हैदराबादमध्ये छापा टाकून पुढील तीन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले:
मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय २०)
मेहराजा इब्राहिम सय्यद (वय २२)
सिराज इब्राहिम सय्यद (वय २१)
DSP चौकात तीव्र आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर माघार
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिक व सहकाऱ्यांनी DSP चौकात तीव्र आंदोलन छेडले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
"हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाईल, तसेच आरोपींची बेकायदेशीर घरे पाडण्याची योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली जाईल," असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर धीरज परदेशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आणि रात्री उशिरापर्यंत नालेगाव अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

No comments:
Post a Comment