वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई; शेतकऱ्यांच्या साहित्यचोरीचा पर्दाफाश, तीन आरोपींना अटक; सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त



दर्पण न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी :- अंकुश भोसले 

०४ ऑगस्ट २०२६ 

इंदापूर (पुणे ) — वालचंदनगर पोलीस स्टेशनने शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून, ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप, सौर मोटार पंप आणि चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सौर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप, मोटार पंप केबल वायर यांसह विविध साहित्याच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गतीने करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.

तपासादरम्यान पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड आणि पोलीस शिपाई गणेश वानकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जयदीप नानासो घोळवे आणि त्याचे दोन साथीदार यांनी लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या ट्रॉली चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने जयदीप नानासो घोळवे, मेघराज नानासो ओंबासे आणि आकाश विलास शिंदे, तिघेही रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे, यांना भवानीनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनीही वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, चारचाकी पिकअप वाहन आणि मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर एकूण तीन गुन्हे उघडकीस आले. गु. रजि. नं. २२५/२०२६, ०५/२०२६ आणि ८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार नोंद असलेल्या गुन्ह्यांचा या टोळीशी संबंध निष्पन्न झाला. तसेच चोरीस गेलेला न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर ट्रॉली, एक महिंद्रा कंपनीचे पिकअप, एक सौर मोटार पंप आणि ट्रॉली चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, जप्त मुद्देमाल संबंधित फिर्यादी आणि शेतकऱ्यांना परत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, तसेच पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर आणि राहुल माने यांनी केली.

वालचंदनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment