मूर्तिजापूरात अण्णाभाऊ साठे जयंती 'राष्ट्रीय लोककला दिन' म्हणून साजरी करण्याची मागणी
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तिजापूर, दि. ५ : लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला 'राष्ट्रीय लोककला दिन' म्हणून घोषित करून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी कलाविष्कार साहित्य कला क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतीय सांस्कृतिक वारसा, संस्कार, संस्कृती आणि परंपरा लोककलेच्या माध्यमातून जपण्याचे आणि आजतागायत जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य लोककलावंतांनी केले आहे. त्यामध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांनी लोककलेचा ठेवा केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार परदेशातही पोहोचविला. त्यामुळे लोककलेचा जागतिक स्तरावर गौरव करणाऱ्या या लोकनायकाची जयंती पुढील वर्षापासून 'राष्ट्रीय लोककला दिन' म्हणून साजरी करण्यात यावी, असा प्रस्ताव संस्थेच्या वतीने मांडण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल डाहेलकर यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय दंडाधिकारी अपार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मिलिंद अवचित इंगळे, कार्याध्यक्ष अनिल डाहेलकर, पत्रकार गजानन तायडे, नागोराव तायडे, सामाजिक कार्यकर्ते विलास वानखडे, श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडाचे अध्यक्ष व पत्रकार गजानन चव्हाण, पत्रकार अतुल नवघरे, मनीषा तायडे, सुनील वानखडे, गोपाल गायकवाड, प्रफुल्ल भटकर, निलेश खडसे, कैलास आमटे, गोपाल पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते वासुदेव धूरदेव आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment