स्वातंत्र्य दिनापासून खतांची ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू ; घरबसल्या उपलब्ध साठा पाहून करता येणार बुकिंग
प्रतिनिधी - गणेश ठाकरे लासलगाव
शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दिनांक १५ ऑगस्टपासून नाशिकसह राज्यातील १२ जिल्ह्यांत खतांची ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेमुळे शेतकरी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जवळच्या कृषी सेवा केंद्रांमधील खतांचा उपलब्ध साठा पाहून थेट बुकिंग करू शकतील.
ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याने तीन दिवस खताचा साठा राखून ठेवणे बंधनकारक असेल. शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत केंद्रावर जाऊन पैसे भरून खताचा ताबा घ्यावा लागेल.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, ही योजना प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरल्यानंतर नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, लातूर, धाराशिव आणि गडचिरोलीसह एकूण १२ जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, खतांचा तुटवडा, अनावश्यक गर्दी तसेच काळाबाजार रोखण्यास या व्यवस्थेची मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
• अशी असेल प्रक्रिया
मोबाईल ॲपवर नोंदणी करून लॉगिन करावे. जवळील कृषी सेवा केंद्र व उपलब्ध खतांचा साठा पाहावा.
आवश्यक खताची ऑनलाइन बुकिंग करावी.
बुकिंगनंतर तीन दिवसांत केंद्रावर जाऊन पैसे भरून खताचा ताबा घ्यावा.
• रासायनिक खतांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे अभिनंदनीय पाऊल उचलले आहे, मात्र, ऑनलाइन बुकिंग नंतरही खते उचलतांना दुकानदार वाढीव रक्कम मागू शकतो, त्यामुळे ऑनलाईन बुकिंग सोबतच ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध व्हावी. --प्रकाश पाटील माजी पंचायत समिती सदस्य

No comments:
Post a Comment