बाळापूर येथील खून व अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; ९० दिवसांच्या अथक शोधानंतर नांदेड येथून अटक
प्रतिनिधी गजानन चव्हाण
बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, १०३, ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या खून व अॅट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी शिवराज एकनाथ वडगावे याला बालापूर पोलिसांनी तब्बल ९० दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर नांदेड येथून अटक केली आहे.
सदर गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो सतत आपले ठिकाण बदलत होता. कधी नांदेड, तर कधी तेलंगणा, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई आणि इतर भागात वास्तव्य करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गोपनीय माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. अखेर आरोपी नांदेड परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडी मिळविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात बालापूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अमित दांडगे यांच्या देखरेखीखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्यासह बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, फरार आरोपींविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment