उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सोनाक्षी कोळपेचे घवघवीत यश; शिवाजी विद्यालयात जाहीर सत्कार
संस्था सचिव सौ. रत्नाबाई कोलते यांच्या हस्ते गौरव; शिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
सोयगाव जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी विद्यालय, सावळदबारा येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी सोनाक्षी भागवत कोळपे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
तिच्या या यशाबद्दल विद्यालयात संस्था सचिव सौ. रत्नाबाई कोलते यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाक्षीला शालेय साहित्य भेट देऊन तिच्या यशाचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. रत्नाबाई कोलते म्हणाल्या की, "सोनाक्षीने कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. तिचे यश हे विद्यालय आणि सावळदबारा गावासाठी अभिमानास्पद असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा."
यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगत सर्व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. सहशिक्षिका श्रीमती पुष्पा ठोंबरे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करत, या यशामुळे सोनाक्षीला पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक तसेच जीवन कोलते, विकास पाटील, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, विजयसिंग राजपूत, भास्कर खामट, मुकुंदा व्यवहारे, भूषण देसले, अमोल कोलते यांच्यासह शिक्षकवृंद, बाबासाहेब कोलते, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, राहुल बडक तसेच पालकांनी सोनाक्षीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंग राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुकुंदा व्यवहारे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment