गावातील अवैध धंद्याची माहिती पोलिस पाटील थेट एसपींना पाठवणार



 प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रेणीक लोढा यांनी कडक भूमिका घेतली असून, गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती तात्काळ पोलिस अधीक्षक यांना देण्याच्या कडक सुचना पोलिस पाटलांना देण्यात आल्या आहेत. सुचनांचे पालन न केल्यास संबंधित पोलिस पाटलांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा थेट आणि कडक इशारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी दिला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील

कोणत्याही गावात अवैध दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा, अमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती संबंधित पोलिस पाटलांना मिळाल्यास त्यांनी ती तात्काळ पोलिस अधीक्षक यांच्या व्हॉअसपवर देणे बंधनकारक असल्याचे एसपी लोढा यांनी स्पष्ट केले. याउलट, गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिस पाटलांनी जाणीवपूर्वक लपविली आणि पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने किंवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकून त्या ठिकाणी कारवाई केली, तर संबंधित पोलिस पाटलांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस पाटील हे पोलिस प्रशासनाचे महत्त्वाचे दुवा असून, त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी केले. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, यापुढे अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या इशाऱ्यातून मिळत आहेत.

No comments:

Post a Comment