जाफ्राबाद तालुक्यात बोगस विद्यार्थी संख्या व अपात्र शिक्षकांचा सुळसुळाट कागदोपत्री महाविद्यालये उभी करून विद्यार्थ्यांची लूट
* वर्गात फक्त दहा-पंधरा विद्यार्थ्यांची उपस्थिती* विज्ञान विषयांसाठी अपात्र शिक्षकांची नियुक्ती* परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची वसुली
जाफ्राबाद तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खाबोगिरीने कळस गाठला असून, गाव तिथे शैक्षणिक संस्था उघडून शासनासह पालकांची सर्रास फसवणूक सुरू आहे. खेडोपाड्यात कागदावरच पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालये उभी केली जात असून, या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षणप्रेमी नागरिकांनी केला आहे.
तालुक्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या तुकड्या मंजूर करून घेतल्या आहेत. कागदोपत्री प्रत्येक वर्गात साठ ते ऐंशी विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शंभर टक्के हजेरी दाखवली जाते. मात्र, प्रत्यक्षात वर्गखोल्यांमध्ये दहा ते पंधरा विद्यार्थीही उपस्थित नसतात. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांसाठी एमएस्सी, बीएड पात्रता असलेले शिक्षक आवश्यक असताना, इतरच विषयांच्या किंवा अप्रशिक्षित शिक्षकांकडून वर्ग भरवले जात आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया केवळ कागदावर दाखवून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला खोटे प्रस्ताव सादर केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वर्षभर ही महाविद्यालये ओसाड असतात, मात्र ऐन परीक्षा आणि प्रवेशाच्या वेळी संस्थाचालकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपयांची वसुली केली जाते. या काळात महाविद्यालयाचा परिसर विद्याथ्यर्थ्यांनी फुलून जातो. त्यामुळे वर्षभर हे विद्यार्थी आणि शिक्षक कुठे असतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सधन नागरिक आपल्या मुलांना जालना किंवा छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित क्लासेसला पाठवतात, तर शेतकरी व कष्टकऱ्यांच्या मुलांना नाईलाजाने या बोगस संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. पोटाला चिमटा काढून फी भरूनही मुलांना शिकवण्यासाठी पात्र शिक्षक नसल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणसाला शिक्षण मिळावे म्हणून घडवलेल्या शैक्षणिक क्रांतीचे आज बाजारीकरण झाले आहे. याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडून पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
* शिक्षणप्रेमींच्या प्रमुख मागण्या *
तालुक्यातील सर्व खाजगी शाळा व महाविद्यालयांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करावी. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष, बायोमेट्रिक हजेरी आणि शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासावी. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मान्यता तात्काळ रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

No comments:
Post a Comment