शेतात वाघ, वस्तीत अस्वल; दगडथर-घानमुखकरांचा संताप अनावर
वनविभागाला अंतिम इशारा – ‘२९ जूनपर्यंत उपाय करा, अन्यथा वाचवा... वाचवा... आंदोलन
महागाव, प्रतिनिधी :अक्षय डोंगरे दर्पण वार्तापत्र
महागाव तालुक्यातील दगडथर व घानमुख परिसरात गेल्या तीन वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असून शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव यांना निवेदन सादर करण्यात आले असून २९ जूनपर्यंत ठोस उपाययोजना न झाल्यास वाचवा... वाचवा...आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनानुसार अस्वल, वाघ, रानडुक्कर, रोही यांसारखे वन्य प्राणी आता जंगलापुरते मर्यादित न राहता थेट मानवी वस्ती व शेतशिवारात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना शेतीची कामे करणे धोकादायक झाले आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी भीतीपोटी शेतात जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत उत्तम मारोती खराटे, शिवाजी परसराम खराटे, राजू गरदाल जाधव, माधव नागोजी डोकळे, साहेबराव पागाजी खोकले, मंगल राणा राठोड, सुधाकर मोहन मुडे, दत्ता बुद्धाजी खराटे, दीपक मारोती खराटे व बिबीचंद बालू पवार यांच्यासह अनेकांवर वन्य प्राण्यांनी हल्ले केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे महिलांनी शेतात जाणे कमी केले आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकही घराबाहेर पडताना घाबरत आहेत. दिवसाढवळ्या रस्त्यावर वन्य प्राणी दिसत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप केला आहे. पिकांचे नुकसान होऊनही अनेकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. जखमींना सानुग्रह मदतही वेळेत मिळत नसल्याने संताप वाढत आहे.
निवेदनात वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करणे, जंगल परिसरात तारकुंपण उभारणे, जखमींना सानुग्रह मदत देणे व प्रलंबित पीक नुकसानभरपाई अदा करणे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर गोकुळ चंदू चव्हाण (सरपंच, ग्रामपंचायत दगडथर), देविदास तुकाराम बुरकुले (माजी सरपंच, ग्रामपंचायत दगडथर), नामदेव दिनाजी खोकले, मदन परसराम राठोड (कारभारी), पांडुरंग श्रावण मुडे, भाऊराव खुबा मुडे (घानमुख), मुकींदा गोपा जाधव (माजी सरपंच, घानमुख), मंदिर दुधराम जाधव आणि अनिल सुभाष आडे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अॅड. कॉ. डी. बी. नाईक व देविदास मोहकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, वनविभागाने वेळेत उपाययोजना न केल्यास दोन्ही गावांतील महिला, पुरुष व शेतकरी कुटुंबांसह वनविभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दगडथर व घानमुखमधून उठलेला हा आक्रोश आता संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला असून वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वन्यजीव संरक्षणासोबत ग्रामीण नागरिकांचे जीवन आणि उपजीविका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment