दैनिक दर्पणच्या वृत्तांची दखल; टिटवी-पळसखेडा सिमेंट नाला बांध अखेर इस्टिमेटनुसार पूर्ण
कार्यकारी अभियंता बिडकर, डी.वाय. मॅडम घोंगरे व इंजिनिअर शिंपी यांची तातडीची हस्तक्षेपात्मक भूमिका; ठेकेदाराकडून उर्वरित कामे पूर्ण
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
टिटवी-पळसखेडा शिवारातील धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामाबाबत उपस्थित झालेल्या तक्रारी आणि प्रसारमाध्यमांमधून झालेल्या वृत्तप्रसाराची संबंधित विभागाने गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले आहे. कार्यकारी अभियंता बिडकर साहेब, डी.वाय. मॅडम रुचिता घोंगरे आणि इंजिनिअर शिंपी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित ठेकेदार व मे. रितेश कन्स्ट्रक्शन, छत्रपती संभाजीनगर यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यानंतर बांधावरील उर्वरित कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सदर कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक शेतकरी व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बांधाची उंची, कोलाई आणि इतर तांत्रिक बाबींबाबत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते.
यानंतर संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करत आवश्यक दुरुस्त्या केल्या. कामाची गुणवत्ता आणि तांत्रिक बाबींची पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, बंधारा आता अपेक्षित स्वरूपात पूर्ण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
दरम्यान, डी.वाय. मॅडम रुचिता घोंगरे यांनी यापुढे कोणत्याही प्रकारच्या दर्जाहीन किंवा नियमबाह्य कामांना पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश संबंधितांना दिल्याची माहिती मिळाली आहे. शासनाच्या निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि इस्टिमेटनुसारच व्हावीत, यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
कार्यकारी अभियंता बिडकर साहेब यांनीही विकासकामांमध्ये गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याची चर्चा आहे. संबंधित ठेकेदाराला कामातील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच काम समाधानकारक मानण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुधारित कामाची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन प्रशासनाने आवश्यक कार्यवाही केली, ही सकारात्मक बाब आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि जागरूक नागरिक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
स्थानिक शेतकऱ्यांनी देखील सुधारित बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करत, वेळेत दखल घेतल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment