कांदाटी विकास संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विकास चर्चासत्र उत्साहात संपन्न
### **AI, रोजगाराच्या संधी व कांदाटी खोऱ्याच्या विकासावर मान्यवरांचे मार्गदर्शन**
प्रतिनिधि - सुरेंद्र जाधव
मुंबई : कांदाटी विकास संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा, लोकप्रतिनिधी सत्कार समारंभ व कांदाटी खोऱ्याच्या विकासावर चर्चासत्र नुकतेच मालाड (पूर्व) येथील निर्मला वाणिज्य महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले.
कांदाटी खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, त्यांना प्रेरणा व भविष्यातील संधींची माहिती देणे तसेच कांदाटी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती मा. श्री. संजय मोरे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. लक्ष्मण जंगम, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. तुळशीराम शिंदे, मा. ॲड. संजय जंगम, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय जाधव, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. लक्ष्मण जाधव (झांजवड),आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. राजाराम जाधव (एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, संस्कार आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून भविष्यातील आव्हानांना सामोरे जावे, असे त्यांनी सांगितले.
दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. लक्ष्मण जाधव यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःला रोजगारक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणासोबत समाजासाठी योगदान देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेवक श्री. लक्ष्मण जंगम यांनी कांदाटी खोऱ्याच्या विकासाच्या विविध विषयांवर भाष्य करताना शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली.महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती श्री. संजय मोरे यांनी कांदाटी भागाच्या विकासावर सकारात्मक मार्गदर्शन केले. शिक्षण, रोजगार, रस्ते, पाणी, पर्यटन, शेती आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगरसेवक श्री. तुळशीराम शिंदे, ॲड. संजय जंगम, श्री. बबन चव्हाण आणि उद्योजक श्री. सीताराम जाधव यांनी सामाजिक विकास, उद्योग व रोजगार निर्मितीच्या विषयावर आपले विचार मांडले.
कांदाटी खोऱ्यातील कांदाटी विकास संघाचे अध्यक्ष श्री. बबन चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. सीताराम जाधव (लक्ष्मी फूड्स, उद्योजक), सचिव श्री. हनुमंत भोसले, खजिनदार श्री. राम निवळे उपाध्यक्ष प्रदीप कदम, माझी अध्यक्ष श्री. मारुती कदम,सखाराम कदम ,अर्जुन चव्हाण तसेच कोयना खोऱ्यातील श्री सोमराज शिंदे ,श्री सुरेंद्र जाधव ,श्री संजय सकपाळ ,राजू जाधव तसेच कांदाटी खोऱ्यातील १६ गावांचे सरपंच उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी कांदाटी खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाध्यक्ष मा.श्री. रामचंद्र रामजी चव्हाण (निवृत्त शासकीय अधिकारी) यांनी आभार व्यक्त करताना कांदाटी खोऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
"कांदाटी खोऱ्याचा आवाज... विकासाचा ध्यास!" या संकल्पनेतून आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि कांदाटी भागाच्या विकासासाठी सकारात्मक दिशा देणारा ठरला.कांदाटी विकास संघाच्या यशस्वी आयोजनाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

No comments:
Post a Comment