अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास



  (वैभव कळस )

',म्हसळा पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन प्रक्रियेत यश; विशेष न्यायालयाचा निकाल'

म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी निलेश बाबुराव दुर्गावले यास दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माणगाव–रायगड येथील मा. विशेष न्यायालयाने दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी हा निकाल दिला. या निकालामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासासोबतच न्यायालयीन प्रक्रियेचा प्रभावी पाठपुरावा करण्याच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीला यश मिळाले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक झेंडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. म्हसळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी संदीपान सोनवणे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक बांडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही केली.

या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे मांडली. तपासाच्या विविध टप्प्यांमध्ये पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई सांगळे, महिला पोलीस शिपाई वर्षा पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी होण्यासाठी तपासातील पुरावे, कागदपत्रांची पूर्तता आणि न्यायालयीन पाठपुरावा यांना विशेष महत्त्व असते. सदर प्रकरणात सध्याच्या रायगड पोलीस अधीक्षक अचल दालाल यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाजाचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. तसेच माणगाव न्यायालयातील कोर्ट कारकून पोलीस हवालदार कासार यांनी आवश्यक समन्वय साधत प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

म्हसळा पोलिसांनी केलेला तपास, सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला न्यायालयीन युक्तिवाद आणि पोलिसांकडून करण्यात आलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात झालेल्या या दोषसिद्धीमुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण बळ मिळाले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment