जुलै... पावसाच्या आगमनाने बहरलेलं निसर्गवैभव.!



जुलै महिना सुरू होताच पावसाने जणू जोरदार फलंदाजीच सुरू केली. काळ्याभोर मेघांनी आकाश व्यापून टाकले आणि निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली. घोंगावणारे वारे, डोलणारे वृक्ष, पानांवरून टपकणारे पावसाचे मोठमोठे थेंब आणि रिमझिम ते मुसळधार कोसळणाऱ्या सरी मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातात.

दूरवरच्या डोंगरमाथ्यांवर, दाट जंगलात, झाडाझुडपांवर, घरांच्या छप्परांवर आणि टेरेसवर पडणारा पाऊस म्हणजे निसर्गाची एक जिवंत कलाकृतीच! घरट्यात विसावलेले पक्षी, त्यांची घरट्याची ऊब अनुभवत असतानाच मधूनच भुर्रकन आकाशात झेपावणारे पक्षी हे दृश्य मन मोहून टाकते.

पाऊस हा केवळ सौंदर्याचा नाही, तर श्रमाचा आणि आशेचाही ऋतू आहे. चिखल तुडवत रोपलावणी करणारे शेतकरी, तरवा काढणारे कष्टकरी हात आणि मातीतून उगवणाऱ्या हिरव्यागार पिकांचा डोलारा पाहिला की खऱ्या अर्थाने भारताची समृद्धी दिसून येते. काबाडकष्ट करणारा शेतमजूर, डोंगरकपारीत अंगावर पोत्याची किंवा घोंगडीची खोळ घेऊन शेळ्या-मेंढ्या राखणारा मेंढपाळ आणि त्यांच्या श्रमांमुळे जिवंत राहणारे ग्रामीण जीवन हे पावसाळ्याचे खरे चित्र आहे.

हिरवीगार कुरणे, डोलणारी पिके, उंचावरून कोसळणारे शुभ्र धबधबे, थंडगार वारा आणि धुक्याने वेढलेले डोंगर यांचे सौंदर्य शब्दांत मावणारे नाही. गटारे, ओढे, नद्या आणि धरणे तुडुंब भरून वाहू लागतात. निसर्गाची ही संपन्नता पाहताना मन आनंदाने भरून येते.

पावसाळा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. डोंगर-दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर आणि धबधब्यांजवळ पर्यटकांची झुंबड उडते. अशा वातावरणात भाजलेल्या मक्याच्या कणसाचा खमंग सुगंध, वाफाळलेल्या चहाचा कप आणि गरमागरम कांदा भजी यांची मजा काही वेगळीच असते. त्यात पावसाची गाणी कानावर पडली की क्षण आणखी सुंदर बनतो.

मात्र, या रम्य ऋतूची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. नद्यांना आलेले पूर, रस्ते पाण्याखाली जाणे, जनजीवन विस्कळीत होणे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान या बातम्याही मनाला हळहळ लावून जातात. त्यामुळे पावसाचा आनंद घेत असतानाच निसर्गाचा आदर करणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

जुलै महिना म्हणजे निसर्गाने पृथ्वीला दिलेला हिरवाईचा साज. हा ऋतू आपल्याला आनंद, आशा, कष्ट, समृद्धी आणि संयम यांची शिकवण देतो. प्रत्येक पावसाचा थेंब जीवनाला नवी ऊर्जा देतो, तर प्रत्येक हिरवेगार शिवार भविष्यातील समृद्धीचे स्वप्न दाखवते.

चला, पावसाचा मनमुराद आनंद घेऊया; पण निसर्गाचे संवर्धन, पर्यावरणाची जपणूक आणि सुरक्षिततेची जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडूया. कारण पाऊस हा केवळ ऋतू नाही, तर जीवनाला नवसंजीवनी देणारा निसर्गाचा अमूल्य आशीर्वाद आहे.

--- प्रा. संभाजीराव सूर्यवंशी


No comments:

Post a Comment