मानोरा तालुक्यात 'फसल विमा महिना' उपक्रमाला प्रारंभ; मृग बहार 2026 फळपीक विमा योजनेसाठी 14 जुलैपर्यंत सहभागाची संधी
मानोरा | प्रतिनिधी
मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'फसल विमा महिना' साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार-2026) मध्ये सहभागी होण्यासाठी 14 जुलै 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत करण्यात येत असून, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकांचा योजनेत समावेश आहे. विशेष म्हणजे, हळद पिकाचा यावर्षी प्रथमच या योजनेत समावेश करण्यात आल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
फळपिकांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, अतिवृष्टी तसेच इतर हवामानाशी संबंधित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने ही योजना राबविली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर विमा प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
'फसल विमा महिना' अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी गावोगावी भेटी देत असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून योजनेची माहिती देत आहेत. तसेच 'फसल विमा पाठशाळा' आयोजित करून विमा योजनेची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जोखीम संरक्षण आणि लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या जनजागृती उपक्रमामुळे अधिकाधिक शेतकरी योजनेत सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी किंवा भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नवनाथ मगरे तसेच मानोरा तालुका विमा प्रतिनिधी चंद्रशेखर राठोड व विश्वनाथ काळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment