चिखली ग्रामसभेत गदारोळ; सामान्य जनतेवर अन्याय आणि दबावाचा ग्रामस्थांचा आरोप
दर्पण न्यूज श्रीगोंदा प्रतिनिधी.चिखली:
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामसभेत सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला सारून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली गावातील विकासकामे आणि विविध योजनांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच सत्ताधारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र वादविवाद सुरू झाले. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरोप केला की, "प्रशासनाकडून सामान्य जनतेच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. जनतेवर दबाव टाकून मनमर्जीने कारभार चालवला जात आहे."
सभेदरम्यान झालेल्या या वादावादीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यामध्ये ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. ऐन पावसाळ्यात गावातील अंतर्गत रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांवरून नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
सामान्य जनतेवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला. या गदारोळामुळे ग्रामसभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. या प्रकरणी आता गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चिखली येथील नागरिकांकडून केली जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment