संघर्षातून संधी निर्माण करणारा शिक्षक : प्रा. उत्तम कामते यांची प्रेरणादायी यशोगाथा

 


संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी न मिळाल्याने खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करणारा तरुण म्हणजे प्रा. उत्तम कामते. अत्यंत खडतर, प्रतिकूल आणि संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी मराठी विषयातून बी. ए., एम. ए., बी. एड. या पदव्या संपादन केल्या. तसेच प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी (SET), राष्ट्रस्तरीय पात्रता चाचणी (NET) आणि शिक्षक पदासाठीची TET परीक्षा त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.

इतकी शैक्षणिक पात्रता धारण करूनही अपेक्षित नोकरी मिळाली नाही. बेकारीचे चटके, फटके आणि दाहकतेच्या झळा सोसत, अपयशाला नकार देत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला. “नोकरी मिळाली नाही म्हणून शिक्षण थांबवायचे नाही, तर शिक्षणातूनच समाज घडवायचा” या विचारातून त्यांनी कामते करिअर अकॅडमी, कोल्हापूर या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली आणि अध्यापन कार्य सुरू ठेवले.

प्रा. कामते यांनी केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. त्यांनी सुरू केलेले यूट्यूब चॅनेल हे आज स्पर्धा परीक्षेत यश संपादित करण्यासाठी धडपडणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विश्लेषणाचे विश्वासार्ह व्यासपीठ ठरले आहे. 

या चॅनलच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक भरती यांसाठी आवश्यक असलेली अचूक माहिती व सखोल मार्गदर्शन ते नियमितपणे देत आहेत. सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, पंचायत राज, मराठी व्याकरण, बालविकास व शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्र यांसारख्या विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण व्हिडीओ विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, हाच त्यांच्या कार्यामागील मुख्य उद्देश आहे.

आज अनेक विद्यार्थी प्रा. उत्तम कामते यांच्या मार्गदर्शनातून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. जिद्द, मेहनत आणि महत्त्वाकांक्षा असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग सापडतो, हेच प्रा. कामते यांचे कार्य अधोरेखित करते.

कामते करिअर अकॅडमीमध्ये TET, CTET, TAIT, SET, NET अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. येत्या काळात ही अकॅडमी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


शब्दांकन :

प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी

No comments:

Post a Comment