भाजपाला मोठा धक्का : गंगापूर तालुक्याचे सरचिटणीस सचिन मुंडे यांचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश
( दैनिक दर्पन प्रति. पांडुरंग गायकवाड)
गंगापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वाळूज येथील रहिवासी व भाजपाचे एकनिष्ठ, संघर्षशील कार्यकर्ते तथा गंगापूर तालुक्याचे सरचिटणीस सचिन सुभाष मुंडे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या अन्यायकारक वागणुकीमुळे आणि पक्षांतर्गत होणाऱ्या दुर्लक्षामुळे आपण हा कठोर निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सचिन मुंडे यांनी अनेक वर्षे भाजपासाठी तळागाळात प्रामाणिकपणे काम केले. जाती-धर्म, गट-तट न पाहता त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी झटले. मात्र, एवढ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून पक्षात सतत डावलले गेले, अपमानास्पद वागणूक मिळाली आणि कार्यकर्त्यांचा आवाज दाबला गेला. याच अन्यायाविरुद्ध संतप्त होत सचिन मुंडे यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी देत पदाचा राजीनामा दिला.
राजीनाम्यानंतर सचिन मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप नाना बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसने सचिन मुंडे यांचे स्वागत करत “निष्ठावंत कार्यकर्त्याला सन्मान आणि न्याय देणारा पक्ष” असल्याचा संदेश दिला.
सचिन मुंडे यांच्या पक्षांतरामुळे गंगापूर तालुक्यातील भाजपाच्या गटबाजी व कार्यकर्त्यांवरील अन्याय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येणाऱ्या काळात हा राजकीय भूकंप आणखी कोणकोणत्या नेत्यांना हलवतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment