डास, दुर्गंधी व आजारांचे माहेरघर! नगरपंचायतची ढिसाळ भूमिका उघड.
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ११ मध्ये घंटागाडी सेवा पूर्णतः कोलमडली असून, स्थानिक नागरिकांचे आरोग्य थेट धोक्यात आले आहे. इतर वार्डांमध्ये घंटागाडी नियमित येत असताना फक्त वार्ड क्रमांक ११ मध्येच सेवा बंद असल्याने प्रशासनाच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.
घंटागाडी वेळेवर न आल्यामुळे नागरिकांना घरगुती कचरा रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकावा लागत आहे. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून डास, माशा व किडींचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. यामुळे डेंगू, मलेरिया, हिवतापसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
विशेष म्हणजे लहान मुले, गर्भवती महिला व वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य सर्वाधिक धोक्यात आले असून, तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
“कर नियमितपणे भरायचे, पण सुविधा मिळायच्या नाहीत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवेबाबतही प्रशासन अपयशी ठरत असल्याने नगरपंचायतच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वार्ड क्रमांक ११ मध्ये घंटागाडी सेवा त्वरित सुरू करावी, कचरा संकलनाचे नियोजन करावे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment