अखेर न्याय मिळाला! प्रधानमंत्री आवास योजनेचे थकित अनुदान जमा दोन कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग



महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे

महागाव

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले थकित अनुदान अखेर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी किमान दोन कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तसेच पहिल्या डीपीआरमधील शेवटचा ४० हजार रुपयांचा हप्ता तब्बल १४० लाभार्थ्यांना उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.

सन २०१८ पासून या निधीसाठी लाभार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागला. या लढ्याचे नेतृत्व प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे यांनी केले. अनेक वेळा उपोषणे, जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार भेटी, लोकशाही दिनी तक्रारी, आयुक्तांची भेट, तसेच आमदार, खासदार व विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊनही निधी प्रश्न प्रलंबितच राहिला होता.

मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा, संयम आणि ठाम संघर्षाच्या जोरावर अखेर प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. थकित अनुदान जमा झाल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेक वर्षांच्या अन्यायाविरुद्ध उभारलेला आवाज अखेर प्रशासनापर्यंत पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील हा संघर्ष प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला असून ‘संघर्षाला अखेर न्याय मिळतो’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


No comments:

Post a Comment