मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत आयडीयल इंग्लिश स्कूल व शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीची भेट
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड : मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान टप्पा–३ अंतर्गत आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, महाड येथे केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन शाळेच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.
या चार सदस्यीय मूल्यांकन समितीत विस्तार अधिकारी, बीट–दासगाव सौ. नीलांबरी नामदेव घोलप, पदवीधर शिक्षक, किंजळोली येथील श्री. किशोर सखाराम शिर्के, शाळा मांडले येथील मुख्याध्यापक श्री. जगन श्रीराम कोरडे तसेच शाळा कोंडीवते येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री. किशन दिगंबर मुगळे यांचा समावेश होता.
समितीने शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छ व सुसज्ज वर्गखोल्या, अध्यापन-अध्ययन व्यवस्था, शैक्षणिक व प्रशासकीय रेकॉर्ड्स तसेच विविध घटकांनुसार ठेवलेल्या सर्व नोंदींची तपासणी केली. प्रत्येक बाबीचे बारकाईने मूल्यमापन करून समितीने शाळेचे एकूण कामकाज उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.
या अनुषंगाने समितीने शाळेचे प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी, मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापन आणि उपक्रमशील शिक्षकवृंद यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक, सहशैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करत, शाळेच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटीमुळे शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीकडे शाळा प्रभावीपणे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून आले.

No comments:
Post a Comment