महागाव येथे पत्रकार दिन सन्मानपूर्वक साजरा निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेचा मान्यवरांकडून गौरव
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कै. सटवाराव नाईक सभागृह, महागाव येथे पत्रकार दिन सन्मानपूर्वक व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला विभागाचे आमदार किसनराव वानखेडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, महागावचे गटविकास अधिकारी कदम साहेब, महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे, प्रा. शरदचंद्र डोंगरे तसेच विविध माध्यमांचे ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, सत्य, पारदर्शकता व निर्भीड लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील दुर्बल घटकांचा आवाज बनण्याचे काम पत्रकार करीत असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने असूनही निष्पक्ष व वस्तुनिष्ठ पत्रकारिता टिकवणे गरजेचे आहे, असे मतही मान्यवरांनी मांडले. प्रशासन व पत्रकार यांच्यात समन्वय राहिल्यास समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागू शकतात, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित पत्रकार बांधवांचे आभार मानण्यात आले.

No comments:
Post a Comment