सव्वा लाखाची लाच घेताना महावितरणचे अभियंता व वायरमन जाळ्यात
नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील
नेवासा : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी आणि दंड माफ करून देण्याच्या बदल्यात १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागून, त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना नेवासा महावितरणच्या सहायक अभियंत्यासह वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही धडक कारवाई १ जानेवारी २०२६ रोजी नेवासा फाटा परिसरातील देवरे हॉस्पिटलजवळ करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहायक अभियंता, वर्ग-२) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, वायरमन, वर्ग-३) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार बाबासाहेब हराळ यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या 'मंगलमूर्ती क्वा' या प्रकल्पाच्या वीज मीटरमध्ये चोरी झाल्याचा आरोप करून, या दोघांनी त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड करण्याची धमकी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी नेवासा फाटा येथील पावन गणपती मंदिरासमोर लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी झालेल्या तडजोडीत १ लाख २५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १ जानेवारी रोजी देवरे हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. सहायक अभियंता मोरे यांच्या सांगण्यावरून वायरमन आचारी याने ५० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया कडू देवरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक आणि वैभव सुपेकर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment