वेलतूरमध्ये महाविराट भीम मेळाव्याला जनसागराची उसळी..
*आंबेडकरी विचारांचा जागर, धम्मपरंपरेचा भव्य उत्सव संपन्न...*
जितेंद्र गोंडाणे, तालुका प्रतिनिधी :-
कुही :-आंबेडकरी चळवळीचा सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक इतिहास सांगणारा विसावा महाविराट भीम मेळावा २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी वेलतूर येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यात विचार, संस्कृती, धम्मपरंपरा आणि सामाजिक परिवर्तनाचा अनोखा जागर निर्माण झाला. हजारो लोकांच्या उपस्थितीत परिसर गजबजून गेला होता.
मेळाव्याचे उद्घाटन थायलंड येथील भदंत सुमंगलो सुद्धोसो यांच्या हस्ते संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय धम्मबंधुत्वाचे प्रतीक मानल्या गेलेल्या या उद्घाटनाने वेलतूरची भूमी पुन्हा एकदा धम्मचेतनेने उजळून निघाली. उद्घाटनावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरेडचे आमदार संजय मेश्राम, प्रमुख वक्ता म्हणून लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मा.शफी पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शरद चौरपगार, कल्याणमित्र समाधान तिरपुडे, संदीप मेश्राम,मनोज तितरमारे, बालू भाऊ ठवकर, सुनील जुवार,ग्यानिवंत साखरवाडे, सुशिल रामटेके, बाली उके, नाशिक चवरे, अनिरुद्ध भोयर, विलास चंदनखेडे, सह विविध मान्यवरांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मदीप उके यांनी केले तर मेळाव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सौरभ रामटेके यांनी आभार मानले.२७ नोव्हेंबरला धम्मरॅली, भीमसकाळ, सांस्कृतिक नृत्य सादरीकरणे, ढोल ताशा पथकांचा ताल, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांनी वेलतूर जागा झाला. मास म्युझिकल ग्रुपच्या ऑर्केस्ट्राने रात्रीचे वातावरण भारावले.
२८ नोव्हेंबरला पचखेडी म्हसली वेलतूर मार्गावरून निघालेल्या मानव मैत्री धम्म संदेश रॅलीने समता, मैत्री आणि धम्माचा सार्वत्रिक संदेश दिला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संध्याकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात शफी पठाण यांचे प्रखर विश्लेषणात्मक भाषण प्रेक्षकांनी कौतुकाने ऐकली.रात्रीची जंगी कव्वाली प्रसिद्ध कव्वाल फैजान ताज यांच्या दमदार सादरीकरणाने मेळाव्याचे वातावरण उत्साहाने भारून गेले. त्यांच्या सुरेल आवाजातील प्रबोधनात्मक रचना आणि कार्यक्रमातील उत्कटता यामुळे संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर गायिका अश्विनी रोशन यांच्या प्रभावी सादरीकरणांनी रंगमंच उजळून निघाला. त्यांच्या मधुर आवाजाने, सुसंस्कृत सादरीकरणाने आणि प्रबोधनात्मक गीतांनी प्रेक्षक अक्षरशः तल्लीन झाले. दोन्ही कलाकारांच्या कार्यक्रमांना इतका मोठा प्रतिसाद मिळाला की उपस्थित जमाव पहाटेपर्यंत कार्यक्रमात रमून राहिला. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची विशेष सोय करण्यात आली होती.
वेलतूरचा महाविराट भीम मेळावा केवळ सांस्कृतिक महोत्सव नाही, तर आंबेडकरी समाजाच्या समानतेच्या, प्रबोधनाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे सशक्त प्रतीक ठरला आहे. २० वर्षांचा प्रवास पूर्ण करून २० व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या या मेळाव्याने यंदाही प्रबोधनाची नवी ठिणगी पेटवली. कुही तालुक्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उसळलेला जनसागर या परंपरेला नवी उंची देऊन गेला.मेळाव्याचे दोन दिवसांचे आयोजन अत्यंत सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी राहुल बन्सोड, सोपान रामटेके, जितेंद्र गोंडाणे, विवेक मेश्राम, राजेंद्र रोडगे, सुभाष मेश्राम, सौरभ रामटेके, रवि रंगारी, संघरत्न उके, सुमित बन्सोड, ताजूल रामटेके, आशीर्वाद वासनिक, लीलाधर सहारे, दिलीप बन्सोड आदींनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मेळावा शिस्तबद्धपणे पार पडण्यासाठी वेळगांव आणि चिकना येथील समता सैनिक दलाने प्रभावीपणे काम पाहिले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वेलतूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे आणि त्यांच्या टीमने संपूर्ण दक्षता घेतली.

No comments:
Post a Comment