अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी निफाड महसूल विभागाची धडक मोहीम, चार अवजड वाहने जप्त
प्रतिनिधी - गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुका अवैध गौणखनिज कारवाई पथकाने दोन दिवसात एकूण चार अवजड वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी एक वाहन सायखेडा पोलिस ठाणे तर तीन वाहने निफाड पोलिस ठाण्यात जमा केले असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज वाहतूकदारांना खबरदारीचा इशारा मिळाला आहे.
निफाड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध परिसरात गस्त घालत वाहने तपासली. या पथकाने कारवाईदरम्यान वाहतुकीची कागदपत्रे, रॉयल्टी पावत्या, परवाने आणि मालाचा तपशील यांची तपासणी केली. यावेळी खडी व मातीची अवैधरित्या वाहतूक करणारी चार वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी चेतन भंडारी यांचे मालकीचे एम एच १५ जे डब्ल्यू २७८७ हाफ बॉडी डंपर खडीची अवैध वाहतूक करताना आढळले. वाहन जप्त करून त्यांस १.१८ लक्ष, बाळासाहेब चौधरी यांचे मालकीचे हायवा मातीची परवानगी नसलेली वाहतूक करताना आढळले त्यामुळे या वाहनावर २.३० लक्ष, नीरज चोरडिया यांचे मालकीचे हाफ बॉडी डंपर बिना परवानगी वाहतूक करतांना आढळले त्यामुळे त्यांस १.१८ लक्ष रु. तर अब्बास सय्यद यांचे मालकीचे एम एच ०५, ४३२२ हाफ बॉडी डंपर अवैध खनिज वाहतूक प्रकरणात ताब्यात घेऊन १.१८ लक्ष दंड करण्यात आला. सदर वाहनांमधून नियमबाह्य वाहतूक आढळल्याने संबंधित सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली.
कारवाईत झालेल्या सहभागी पथकामध्ये विशाल नाईकवाडे, तहसिलदार निफाड, मंडळ अधिकारी जयंत लिलके, ज्ञानेश्वर केसरे मंडळ, अश्विनी भोसले, तलाठी अमोल चव्हाण, राहुल अहिरे, दिपक पवार, राहुल भांगरे आदींचा समावेश आहे.
निफाड तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खनिज वाहतूक प्रकरणांवर नियंत्रण मिळवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अवैधरित्या खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, पण पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. महसूल विभागाने पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहीमा सातत्याने राबविण्याचा निर्धार केला आहे. तालुक्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसून नियमांचे पालन करूनच खनिज वाहतूक करावी. विशाल नाईकवाडे तहसिलदार, निफाड

No comments:
Post a Comment