रायगड कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे औषध सुरक्षाविषयी जनजागृती कार्यक्रम



— संभाजीराव सूर्यवंशी महाड तालुका प्रतिनिधी

अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबरच आजारांपासून प्रतिबंध व उपचारासाठी औषधांची गरज महत्त्वाची आहे. मात्र औषधे ही दुधारी तलवार असून योग्य वापर आरोग्यास लाभदायी तर अयोग्य वापर धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव करून देण्यासाठी रायगड कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे औषध सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

अलीकडेच मध्यप्रदेशमधील कप सिरप प्रकरणात 20 पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या निर्देशानुसार रायगड कॉलेज ऑफ फार्मसी आणि महाड-पोलादपूर केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिरवळ ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी) आणि ओम साई इन्स्टिट्यूट, महाड येथे हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी श्री. मोहन काका शेठ, श्री. वरुण शेठ, रायगड शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री. विजयजी चिमणकर, विभागप्रमुख श्री. अमोल तांगडे, हिरवळ ट्रस्ट कॉलेजचे प्राचार्य कदम सर, ओम साई इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर श्री. बागडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका सौ. माया देसाई यांनी औषधे खरेदी करताना लेबलवरील माहिती तपासणे, औषधांची सुरक्षित साठवण, एक्सपायरी तपासणे, एकमेकांची औषधे न वापरणे, तसेच औषधे नेहमी डॉक्टर व फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘औषध सुरक्षा शपथ’ घेतली. औषधांच्या सुरक्षित वापराबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याची आणि तिची योग्य अंमलबजावणी करण्याची सकारात्मक प्रतिक्रिया सहभागींनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment