“बाल उद्योजक” उपक्रम; लहानग्यांकडून छोटे उद्योग प्रत्यक्षात राबवून दाखवले...! अभिनव शिक्षक जयंत कापसे यांची उपक्रमशीलता ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा.

 



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

     शिक्षक उपक्रमशील आणि कल्पक असतील तर ग्रामीण भागातील लहान विद्यार्थ्यांचेही ज्ञानभांडार समृद्ध कसे होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबेगाव. येथील प्राथमिक शिक्षक जयंत निवृत्तीनाथ कापसे यांनी “बाल उद्योजक, उद्याचा उद्योजक घडवूया” हा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी प्रत्यक्ष जोडले असुन मुलोद्योगी शिक्षणाशी नाळ जोडली जाणार आहे.

इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी खडू बनवणे, ग्लिसरीन बेस पर्यावरणपूरक साबण तयार करणे, सोया वॅक्स वापरून मेणबत्ती बनवणे, नैसर्गिक कुंकू, पर्यावरणपूरक धूप, आयुर्वेदिक केसतेल, गजरे व हार बनवणे तसेच मशरूम लागवड तंत्र अशा प्रत्यक्ष कार्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेऊन वस्तू उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये दृढ व आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या हातकौशल्यात, जिज्ञासूपणात आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना लाकडी तेल घाणा, ढेप उद्योग व पैठणी क्लस्टर या स्थानिक उद्योगांना भेट देऊन उत्पादन पद्धती, स्वच्छता, शिस्त व सामूहिक कार्यसंस्कृती चा अनुभव देण्यात आला.


पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून ग्रामीण शाळेतही शिक्षणाचा आनंद आणि गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढील प्रस्तावित उपक्रम

१. तारेची जाळी तयार करण्याच्या उद्योगाला भेट

२.आयुर्वेदिक शाम्पू तयार करणे

३. डिंक निर्मिती कार्यशाळा


या सर्वांमधून पर्यावरणपूरक उत्पादन व निसर्ग संवर्धनाचा वैज्ञानिक संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षण जीवनाशी जोडणारा, प्रयोगशील, आणि अर्थपूर्ण बनत असल्याने शिक्षक जयंत कापसे यांनी राबवलेला हा नवोपक्रम निश्चितच कौतुकास पात्र ठरेल. या उपक्रमात त्यांना त्यांच्या सहकारी शिक्षिका श्रीमती कुशारे यांनी मोलाची मदत आणि सहकार्य केले.

“उद्योग, कौशल्य आणि शिक्षण यांचा सुंदर मेळ घातल्यावर मुलांची जिज्ञासा आणि आत्मविश्वास दोन्ही दुप्पट वाढतो. मुलांना केवळ उत्तरे शिकवायची नसतात, तर समस्या सोडवायला शिकवायच्या असतात हा आमच्या उपक्रमांचा खरा हेतू आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, जिद्द, संघभावना आणि उद्योगशीलता हे गुण विकसित होत असल्याचे शिक्षक वर्गात नमूद केले. शिक्षण जीवनाशी जोडल्यावरच ते अर्थपूर्ण बनते.- जयंत निवृत्तीनाथ कापसे, प्राथमिक शिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव”


No comments:

Post a Comment