ज्याचं नाही अस्तित्व, तो म्हणतो मीच भावी सदस्य
कुही तालुक्यात जि.प. आणि पं.स. निवडणुकीची मोर्चेबांधणी तापली
स्वप्नील खानोरकर
कुही : गेल्या चार-पाच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला अखेर मुहूर्त लाभला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत जाहीर केल्याने तालुक्यातील राजकीय पारा उसळला आहे.तालुक्यात चार जिल्हा परिषद सर्कल असून आठ पंचायत समिती सर्कल आहेत.गावोगावी भेटीगाठी, सोशल मीडियावर सक्रियता आणि “मीच भावी सदस्य” अशी घोषणा देत अनेकांनी आपली राजकीय उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे.
आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावर उमेदवारीची चमक दिसू लागली, तर काहींच्या स्वप्नांचा चुराडा झाला. काही ठिकाणी "कही खुशी, कही गम" असं चित्र दिसत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इच्छुकांनी गावोगावी मोर्चेबांधणी सुरू केली असून काहींनी आपले नाव सोशल मीडियावर “भावी सदस्य” म्हणून लावून चर्चेचा विषय बनवला आहे.तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू असून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे. स्थानिक गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि जुने वैमनस्य यांचा विचार करता पक्षनेत्यांसमोर तारेवरची कसरत उभी राहत आहे. काही नाराज कार्यकर्ते बंडखोरीचा झेंडा उभारण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दिवाळीपूर्वीच तालुक्यातील राजकारण फटाक्यांपेक्षा जास्त आवाज करणार, हे आता स्पष्ट झाले आहे.कुही तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे सत्तेच्या वर्तुळात प्रवेशाची शर्यत आणि प्रतिष्ठेची जुगार बनल्या आहेत.
No comments:
Post a Comment