दहेगांव - पचखेडी रस्ता खड्डेमय, प्रवास करणे म्हणजे मृत्युला आमंत्रण...रस्त्यांपेक्षा खड्डेच जास्त..

  



जितेंद्र गोंडाणे 

कुही तालुका प्रतिनिधी–  तालुक्यातील दहेगांव-पचखेडी हा रस्ता  साधारण २००७ साली प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून बनविण्यात आला आणि त्यानंतर विस्मरणात गेला. आज या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की पायी चालणेही धोक्याचे ठरत आहे. पचखेडी हे मोठे गांव असून दहेगाव ,वेळगांव,ठाणा येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे साहित्य घेण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या मार्गावरून रोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत असून  दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. कितीदा तरी दुचाकीस्वार या रस्त्यावरुन पडलेले आहेत.

        एकीकडे मात्र मुख्य रस्ते रंगरंगोटीने सजलेले दिसतात तर दुसरीकडे ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा पाहून हीच का विकासाची वाट? असा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्त्याची खरी स्थिती दिसतच नाही. परिणामी गाडी कुठून चालवावी असा प्रश्न चालकांसमोर  उभा ठाकतो. शेतात जाणारे कच्चे रस्ते तरी व्यवस्थित दिसतात पण हा रस्ता तर अक्षरशः थेट वैकुंठाला नेणारा मार्गच ठरू लागला आहे.

       निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाकडून खड्डेमुक्त रस्त्याचे गाजर दाखवले जाते. मात्र आजतागायत नागरिकांना मिळालेला विकास म्हणजे खड्ड्यांचा महासागरच. खड्डेमुक्त प्रवास कधी होणार? हा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थ आता थेट प्रशासनाला विचारू लागले आहेत.या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोनाचा  इशारा माजी सरपंच जितेंद्र गोंडाणे, शरद घरडे, परमानंद शेंडे,बबलू गोंडाणे,  खोमदेव हलमारे, शुभम कावळे, नामदेव झंजाळ, अमरदिप मांढरे, अंबादास भगत, शांताराम मांढरे, अंताराम मेश्राम यांच्या सह नागरिकांनी यांनी दिला.

No comments:

Post a Comment