ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रक्तदान शिबिराचे आयोजन
स्वप्नील खानोरकर कुही, २७ ऑगस्ट –
शेगाव निवासी संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी आणि ऋषिपंचमी निमित्त कुहीत भाविकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संत गजानन महाराज संस्थान, कुही यांच्या वतीने गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी महाराजांच्या समाधी दिनाचा ११५ वा वर्ष सोहळा साजरा होत आहे.
कुही पोलिस स्टेशन समोर असलेल्या गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ऋषिपंचमीचा सोहळा धार्मिक उत्साहात पार पडणार आहे. याच दिवशी समाधी दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ होईल.साईनाथ ब्लड बँक, नागपूर यांच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिरात स्वतःहून रक्तदान करणाऱ्या भाविकांना संस्थानतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. "एक व्यक्ती रक्तदान करते तेव्हा त्याचा लाभ चार रुग्णांना होतो," असे सांगून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान विक्रम घडवावा, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment