शिरूर पोलिसांची जबरदस्त कारवाई – लाखोंचे सोन्याचे दागिने मूळ मालकांकडे परतवले...
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करून, न्यायालयाच्या आदेशानंतर ते मूळ मालकांना परत केले. ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली असून, शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रथम प्रकरणामध्ये, दिनांक ११ मे २०२५ रोजी फिर्यादी रूपाली अनिल काळे (वय ४०, व्यवसाय - घरकाम, रा. त्रिमूर्तीनगर, भिगवन रोड, जळोची, बारामती) या शिरूर बस स्थानक परिसरात असताना, त्यांच्या जवळील अंदाजे ३,९०,००० रुपये किमतीचे ६.१ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरीस गेले होते. सदर गुन्हा मनिषा विजय कसबे (वय ४०) व शोभा शंकर दामोदर (वय ३०, दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या महिलांनी केला होता.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२५ भा.दं.सं. कलम ३०३(२) अंतर्गत नोंदवण्यात आला होता. तपास कार्यात पोलिसांनी तत्काळ अटक करून आरोपींकडून चोरी गेलेले सोन्याचे गंठण हस्तगत केले.
दुसऱ्या प्रकरणात, दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) या महिला शिरूरमधील सुरजनगर येथील हॉटेल श्रेयश शेजारील पुलावरून जात असताना, “आजी” अशी हाक मारून चार जणांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि दिशाभूल करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरी केले.
या गुन्ह्यात एक मनी मंगळसूत्र (३ ग्रॅम, किमती ₹१८,०००) व सोन्याचे कानातील फुल वेलसह दागिने (१० ग्रॅम, किमती ₹६०,०००) असा एकूण ₹७८,००० किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. आरोपींमध्ये हरी गंगाराम बावरी राठोड, सुरज हसमुखभाई राजपूत, राहुल हसमुखभाई राजपूत, गौरांग चंद्रकांत पटेल (सर्व राहणार गुजरात) आणि बबलु विरचंद सोलंकी (रा. नागपूर) यांचा समावेश होता.
या प्रकरणी गु.र.क्र. ९६५/२०२४ भा.दं.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सर्व आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला.
उभय प्रकरणात हस्तगत केलेले सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक २४ जून २०२५ रोजी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते मूळ फिर्यादी – रूपाली काळे व छबुबाई बनसोडे – यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.
या यशस्वी कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस हवालदार बापू मांगडे यांनी केली.
या कारवाईमुळे दोन्ही फिर्यादी महिलांनी समाधान व्यक्त केले असून, नागरिकांकडून शिरूर पोलिसांच्या तत्परतेचे आणि प्रामाणिक तपासाचे विशेष कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment