पुर्णा नदीकाठावर वाळू चोरी बळावली ; टाकळखोपा- किर्ला , देवठाणा आणि वझर सरकटे ही केंद्रे बनली ‘हॉटस्पॉट
मंठा :गोपाल जाधव (प्रतिनिधी)
पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा - किर्ला , खोरवड- उस्वद- हनवतखेडा , पोखरी केंधळे - भुवन व वझर सरकटे गावांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरु असून, ही चोरी रोखायची असेल तर टाकळखोपा- किर्ला, देवठाणा व वझर सरकटे या मुख्य केंद्रांमध्ये २४ तासांचे बैठे पथक तैनात करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या महसूल विभागाचे पथक वाळू चोरांच्या सोयीने हालचाली करत असल्यामुळे शासनाचे डिझेल, वेळ आणि महसूल वाया जात आहे.
वाळू चोरीची केंद्रबिंदू गावे:
देवठाणा: खोरवड, उस्वद, हनवतखेडा, कानडीसाठी वाळू उत्खनन
टाकळखोपा : स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत
वझर सरकटे: पोखरी केंधळे व भुवन या गावांसाठी वाहतूक
मागण्या आणि उपाययोजना:वरील तिन्ही गावांमध्ये २४ तास बैठे पथक बसवावे, जेणेकरून नागरिकांचा विश्वास वाढेल आणि वाळू चोरी ९५% पर्यंत थांबेल.प्रत्येक पथक १२ तासांची ड्युटी सांभाळेल आणि नवीन पथक येईपर्यंत जुन्या पथकाने जागा सोडू नये.फिरत्या पथकांनी बैठे पथकांशी समन्वय साधून काम करावे.अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील तर वाळू चोरी बंद होऊ शकते, यात शंका नाही.
गंभीर निरीक्षण: स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई दाखवली जात असून, बाहेरून आलेले कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना स्थानिक कर्मचारी वाळू माफियांना मदत करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.राजकीय हस्तक्षेपाचीही चर्चा: आकाच्या राजकीय वरदहस्ताने काही ठराविक वाळू चोरांना संरक्षण मिळत असून, राजकीय विरोधकांच्या वाळू वाहतुकीवर मात्र सूडबुद्धीने कारवाई होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.
पूर्णा नदीकाठची वाळू चोरी पूर्णपणे थांबवायची असेल, तर प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन बैठे पथक तैनात करणे आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, ही वाळू चोरीची यंत्रणा केवळ महसूलच नव्हे तर प्रशासनाची विश्वासार्हताही पोखरते आहे
No comments:
Post a Comment