मनसेच्या पाठपुराव्याला यश : टोरंट गॅसला शिरूर नगरपरिषदेचा २५ हजारांचा दंड..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर शहरातील जुन्या मार्केट यार्ड समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या त्रिकोणी जागेवर काही महिन्यांपासून अनधिकृतरित्या कंटेनर, लोखंडी साहित्य, मशनरी आणि इतर वस्तू ठेवल्या जात होत्या. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी वास्तव्यही सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सदर जागा सिमेंट कंपाउंड करून लाल अक्षरात “नगरपरिषदेची मालमत्ता” अशी जाहिर सूचना लावण्यात आली असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर वापर सुरू होता.
मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. महेबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड, व शहर सचिव रवी लेंडें यांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, टोरंट गॅस प्रा. लि. या कंपनीने शिरूर नगरपरिषद हद्दीत भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र, परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मशनरी ठेवण्यात आली होती.सदर बाबत कंपनीला ४८ तासात खुलासा मागविण्यात आला होता. मात्र कंपनीकडून कोणताही खुलासा प्राप्त न झाल्यामुळे शिरूर नगरपरिषदेकडून थेट दंडात्मक कारवाई करत २५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी हा आदेश काढला असून, सदर रक्कम तात्काळ भरण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे नगरपरिषदेच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आणि नियमबाह्य वर्तनाविरोधात मनसेच्या नेतृत्वाने उचललेले पाऊल फलद्रूप ठरल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
ही बातमी वाचून नागरिकांतून मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत असून, नगरपरिषदेच्या ठाम भूमिकेचेही स्वागत होत आहे.
No comments:
Post a Comment