शिरूर तहसील कार्यालयासमोर एस.टी. बसचा अपघात; नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर सवाल



रस्त्याच्या मध्यभागी विद्युत पोल; नागरिकांनी दुभाजक पुनःबसवण्याची केली जोरदार मागणी..!

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


शिरूर – शहरातील तहसील कार्यालयासमोरील अंतर्गत रस्त्यावर मंगळवारी रात्री १४ मे रोजी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-शिरूर एस.टी. बसने (MH-40-Y-5828) जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेला विद्युत खांब कोसळला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र शिरूर नगरपालिकेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातामागचे मूळ कारण म्हणजे नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर रस्त्यावर पूर्वी दुभाजक (divider) होता, परंतु **बांधकाम विभागाने कोणत्याही ठोस कारणाशिवाय सुमारे २०० फुटांचा दुभाजक काढून टाकला, ही बाब संशयास्पद आहे. दुभाजक नसल्यानं रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना मार्गाचे योग्य दिशादर्शन होत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी कमी प्रकाशामुळे आणि अचानक रस्त्याच्या मध्यभागी येणाऱ्या विद्युत पोलमुळे दुर्घटनांचा धोका अधिक वाढतो.

अपघातात मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून "हा अपघात की नगरपरिषदेच्या गलथान नियोजनाचा शाप?"असा प्रश्न सोशल मीडियावर आणि चर्चांमध्ये विचारला जात आहे.


नागरिकांची ठाम मागणी –

1. तहसील कार्यालय ते पूल या रस्त्यावर पुन्हा दुभाजक लावण्यात यावे.

2. अपघातग्रस्त भागातील विद्युत पोलचे पुनर्रचना करताना योग्य संरक्षक उपाययोजना करण्यात याव्यात.

3. सदर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.


शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. उद्या याच ठिकाणी एखाद्याचा बळी गेला, तर त्याला जबाबदार कोण? अपघात होण्याआधीच उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हे नगरपरिषद प्रशासनाने लक्षात घ्यावे, अशी कडवी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment