आराध्य भोनकर शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम; पालक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
(वैभव कळस )
पी. एम. श्री. राजीव गांधी जिल्हा परिषद शाळा, म्हसळा येथे आज पालक सभेचे आयोजन करण्यात आले. आगामी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व, विद्यार्थ्यांची तयारी आणि शैक्षणिक प्रगती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर आणि शिक्षक मिलिंद मुंडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांचे प्रबोधन केले.
यावेळी शाळेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा आणि मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आराध्य संदीप भोनकर तसेच ओम अण्णासाहेब बिचुकले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत विभागातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नितारा निलेश चौधरी, तसेच केंद्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करणारे प्रियंक प्रफुल पाटील आणि आराध्य संदीप भोनकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत शिर्के, समितीचे सदस्य, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment