स्मशानभूमीवर शेड नसल्याने मृतदेहाची हेळसांड
(वैभव कळस )
भर पावसात अंत्यसंस्काराची वेळ, चिचोंडेतील घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप'
म्हसळा तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील चिचोंडे गावात स्मशानभूमीवर संरक्षक शेड नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसात मृतदेह उघड्यावर ठेवून अंत्यविधी पार पाडावा लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या घटनेमुळे स्मशानभूमीवरील अपूर्ण कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
"सरण ही थकले मरण पाहुणी...?" या उक्तीची आठवण करून देणारी ही घटना मंगळवारी घडली. चिचोंडे येथील रहिवासी यशवंत बाबू पोटले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र तेथे शेडची सुविधा नसल्याने मुसळधार पावसात मृतदेह भिजत राहिला. पावसातच ग्रामस्थांनी एकमेकांच्या सहकार्याने सर्व धार्मिक विधी पूर्ण करून अंत्यसंस्कार केले.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्मशानभूमीवर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तीच्या सन्मानालाही धक्का बसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, चिचोंडे येथील स्मशानभूमी शेडच्या कामाबाबत यापूर्वीच अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते. संबंधित काम राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित एका सरपंचाच्या मुलाने घेतल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मनसेचे योगेश गोपाळ बोर्ले यांनी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, असा दावा करण्यात आला आहे.
तक्रार करूनही संबंधित यंत्रणेने ठोस कारवाई केली नसल्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. चिचोंडे स्मशानभूमी शेड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शेडच्या कामातील कथित अनियमितता व अन्य आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत, प्रशासन किंवा संबंधित व्यक्तींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

No comments:
Post a Comment