'म्हसळ्यात चोवीस तासात ११४ मी. मी. पाऊस, पाभरे धरण ओव्हरफ्लो, ढोरजे पुलावरून पाणी
(वैभव कळस )
म्हसळा तालुक्यात गेल्या २४ तासात ११४ मी. मी. पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टीने म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणारे पाभरे धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.यावर्षीही ढोरजे येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे म्हसळा -माणगाव, कुडतूडी रस्त्यावरून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.काही दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने दुसरी बॅटिंग जोरदार सुरु केली असून तालुक्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नद्या, नाले फुल झाले असून काहीकाळ वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या.
ढोरजे पुलाची समस्या गेली अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरली असून या परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून आजपर्यंत या पुलाच्या नूतनीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे हिंगुळडोह तुडुंब भरल्याने पाणी रस्त्याच्या दिशेने घुसले होते.जानसई नदी दुतर्फा ओसंडून वाहत असल्यामुळे नदीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अतिवृष्टीआणि धरण क्षमतेपेक्षा फुल झाल्याने धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment