शासकीय अहवालात उघड चिखली येथील पांढरवाळ तलावातून सरपंचाने केला मुरूम उपसा व अतिक्रमण.


दर्पण न्यूज (श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी)- 

मौजे चिखली येथील पांढरवाळ पाझर तलावातून (गट नं. ४७०) तत्कालीन प्रशासक तथा विद्यमान सरपंच कुलदीप पांडुरंग कदम यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उपसा केल्याची आणि तलाव क्षेत्रात अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब शासकीय स्तरावर उघडकीस आली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत स्थळ पाहणी अहवालात या बेकायदेशीर कृत्यावर आणि अतिक्रमणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

चिखली येथील पांढरवाळ पाझर तलावात शासकीय नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर उत्खनन आणि मुरूम चोरी होत असल्याबाबत गावातील सुजाण नागरिक महेश झेंडे यांनी आपले सरकार पोर्टलवर पुराव्यांसह अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभाग (श्रीगोंदा) यांच्या पथकाने पांढरवाळ पाझर तलावाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन शासकीय पाहणी केली.

या शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत पांढरवाळ तलावाच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसल्याचे व तलाव क्षेत्रात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे अधिकृतरीत्या आढळून आले आहे. विशेष म्हणजे, या उत्खननामागे 'राहू फाउंडेशन' या सामाजिक संस्थेचे नाव पुढे केले जात होते. मात्र, राहू फाउंडेशनने प्रशासनाला लेखी खुलासा देऊन पांढरवाळ तलावात (गट नंबर ४७०) कोणतेही काम केले नसल्याचे स्पष्ट केले असून संस्थेने केवळ 'उपळी पाझर तलावात' काम केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरपंच कुलदीप कदम यांनीच पांढरवाळ तलावात हे बेकायदेशीर उत्खनन करून शासकीय मालमत्तेची लूट केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

तक्रारदार महेश झेंडे यांनी सादर केलेले पुरावे शासकीय तपासणीत तंतोतंत खरे ठरले असून, तलावातील मुरुम चोरी आणि अतिक्रमण शासकीय अहवालात सिद्ध झाले आहे. आता याप्रकरणी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन मुरुम उपसा करणाऱ्या सरपंच कुलदीप कदम यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा  दाखल करणार का, याकडे संपूर्ण चिखली पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment