'न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे महिला सुरक्षा विषयावरील सहविचार सभा संपन्न'.

 


(वैभव कळस )

न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे विद्यार्थी सुरक्षा, भौतिक विकास समिती, महिला तक्रार निवारण समिती व सखी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा आणि विद्यार्थी संरक्षण या विषयावर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुसंवादी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने ही सभा अत्यंत उपयुक्त ठरली.

सभेमध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन समीर बनकर, प्राचार्य डी. आर. पाटील, समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका जयश्री कापरे आणि डॉ. सोनाली करंबे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध, शाळेतील भौतिक सुविधांचा विकास, सी.एस.आर. निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न, माजी विद्यार्थी संघटनांची भूमिका, विद्यार्थी सुरक्षा तक्रार निवारण कक्ष, तसेच विद्यार्थी लैंगिक शोषणास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

अध्यक्षीय मनोगतात चेअरमन समीर बनकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थी दिवसातील सर्वाधिक वेळ पालकांच्या सानिध्यात असतो, त्यामुळे त्याच्या दैनंदिन वर्तनातील बदल, हालचाली आणि मानसिक स्थितीकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलापूर येथील घटनेचा संदर्भ देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विद्यार्थिनींच्या समस्या शिक्षकांनी संवेदनशीलतेने जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करणे गरजेचे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी हनमंत मोरे यांनी प्रास्ताविकातून विषयाचे महत्त्व आणि गांभीर्य अधोरेखित केले.

यावेळी चेअरमन समीर बनकर, प्राचार्य डी. आर. पाटील, वाहतूक नियंत्रक सौ. लाड, नगरसेविका जयश्री कापरे, डॉ. सोनाली करंबे, पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले, अपर्णा ओक, योगेश पाटील यांच्यासह शिक्षक व समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोपाचे आभारप्रदर्शन मांजरेकर सर यांनी केले.

No comments:

Post a Comment