'म्हसळा तालुक्यात स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम'.



 (वैभव कळस )

 मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती राजस्व अभियान' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर म्हसळा तालुक्याचे सर्वेसर्वा स्वर्गीय भास्करजी विचारे यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा तालुक्यात विविध सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले.

या निमित्ताने ग्रामपंचायतींना बाकांचे (बेंच) वाटप, विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्यांचे वितरण तसेच लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. याशिवाय स्व. अजितदादा यांच्या प्रतिमांचे वितरण करून त्या शाळा, अंगणवाड्या, तलाठी कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये देण्यात आल्या. समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रमांमुळे तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमांचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले. म्हसळा येथील शासकीय परिसरात वृक्षारोपण करून "देवराई ते देवगिरी" या संकल्पनेला चालना मिळावी आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना त्यांनी म्हसळा व तळा नगरपंचायतींना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध झाल्याचा उल्लेख केला. त्यांच्या विकासदृष्टी आणि लोकाभिमुख विचारांमधून प्रेरणा घेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल पुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनिल शेडगे,पंचायत समितीचे सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, उपसभापती लहुशेठ म्हात्रे,, जिल्हा परिषद सदस्य अभिषेकविचारे , पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले, पं. स. सदस्या प्रियांका निंबरे, तहसीलदार सचिन खाडे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, गटविकासाधिकारी किरवे,संजय कर्णिक,संतोष (नाना ) सावंत, किरण पालांडे, महेश घोले, मीनाताई टिंगरे रेशमा कानसे, विस्तार अधिकारी दिघीकर आदि मान्यवर उपस्थित होते,तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकासकामे आणि सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या योगदानाचे ना. आदिती तटकरे यांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment