खरवंडी येथील मतिमंद विद्यार्थ्यावरील अत्याचारप्रकरणी आमदारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; दोषीवर कठोर कारवाईचे आदेश...
दर्पण न्यूज | खरवंडी (प्रतिनिधी : शरद धाडगे)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे एका ११ वर्षीय मतिमंद शाळकरी बालकावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित बालकाला तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आज खरवंडीत ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटलांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वनघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पीडित बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जलदगतीने सुनावणी व्हावी आणि पोलिसांनी लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करावे, यासाठी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. दोषीवर कायद्यानुसार कठोर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणीही त्यांनी या वेळी केली.
मोर्चानंतर खरवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
"बालकांचे सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बालपण ही समाजाची सर्वोच्च जबाबदारी आहे. अशा अमानुष आणि नराधम कृत्यांविरोधात संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे ठाकले पाहिजे," असा ठाम सूर या वेळी उपस्थितांनी लावून धरला.
राज्यात लहान मुले आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून, अशा गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी शासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.या निषेध मोर्चामध्ये 'रामराज्य उत्सव समिती' (नेवासा), 'सकल हिंदू समाज' (महाराष्ट्र राज्य) यांसह परिसरातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:
Post a Comment