*आषाढी एकादशी निमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूलची उत्साहपूर्ण पायी वारकरी दिंडी*
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी
पिंपळगाव प्रतिनिधी: आषाढी एकादशीचे औचित्य साधून उत्तुर, ता. आजरा येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने विद्यार्थ्यांची पारंपरिक पायी वारकरी दिंडी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात आयोजित करण्यात आली.
लक्ष्मी मंदिर, उत्तुर येथून प्रारंभ झालेली ही दिंडी विठ्ठल मंदिर, उत्तुर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. दिंडीत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच "विठ्ठल विठ्ठल" नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
विद्यार्थ्यांना पायी चालण्याचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा तसेच आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा सुतार, प्रियंका राजाराम, प्रणाली थोरवत, प्राची येजरे, गीता पाटील आणि विद्या शिवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिंडी मार्गावर उत्तुर ग्रामस्थांनी सहभागी विद्यार्थ्यांसाठी खाऊ तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि सामूहिकतेची भावना अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

No comments:
Post a Comment