देवगावचे भूमिपुत्र सर्वेश कुशारेंची ऐतिहासिक झेप; ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडीत रौप्यपदक ; देवगावात जल्लोष
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील देवगावचा भूमिपुत्र व भारताचा आघाडीचा उंच उडीपटू सर्वेश अनिल कुशारे याने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे दि.२७ जुलै २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या उंच उडी प्रकारात २.२५ मीटर उंच उडी मारत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारतासाठी रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला असून, त्याच्या या कामगिरीने देशासह नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अंतिम फेरीत सर्वेशने २.०५ मीटरपासून उंच उडीची सुरुवात करत २.२५ मीटरची उंची यशस्वीरीत्या पार केली. सुवर्णपदकासाठी त्याची चुरशीची लढत झाली; मात्र काउंटबॅक नियमानुसार त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तरीही भारतासाठी ऐतिहासिक यश मिळवत त्याने जागतिक ॲथलेटिक्समध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सर्वेशने यापूर्वी २०२२ आशियाई स्पर्धा, २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच जून २०२६ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत २.३१ मीटर उंच उडी मारत भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. २.३० मीटरची उंची पार करणारा तो भारतातील पहिलाच उंच उडीपटू ठरला.
■ सर्वेश कुशारेची उल्लेखनीय कामगिरी
• २०१९ - दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
• २०२३ - आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक
• २०२५ - जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहावे स्थान
• जून २०२६ - राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत सुवर्णपदक व २.३१ मीटर राष्ट्रीय विक्रम
• जुलै २०२६ - मोनॅको डायमंड लीगमध्ये तृतीय स्थान
• जुलै २०२६ - ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक
■ भुशाच्या पोत्यावर सराव... अन् राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकापर्यंतची झेप
देवगाव (ता. निफाड) या ग्रामीण भागातून आलेल्या सर्वेश कुशारेचा प्रवास संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा आहे. १७ जून १९९५ रोजी जन्मलेल्या सर्वेशने अत्यंत मर्यादित सुविधांमध्ये सराव करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात शिक्षण घेत असताना क्रीडाशिक्षक रावसाहेब जाधव यांनी २०१० पासून त्याला उंच उडीचे प्रशिक्षण दिले. विद्यालयात आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वेशचे वडील अनिल कुशारे आणि रावसाहेब जाधव यांनी मक्याच्या भुशाच्या पोत्यांची तात्पुरती गादी तयार केली. याच गादीवर सर्वेशने उंच उडीचा सराव सुरू केला आणि आपल्या यशाची भक्कम पायाभरणी केली. आधुनिक सुविधा नसतानाही शेतातील कृषी अवशेषांपासून तयार केलेल्या या तात्पुरत्या मॅटवर सातत्याने मेहनत घेत सर्वेशने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. त्याच्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली. आर्थिक अडचणींवर मात करत सर्वेशने भारतीय सैन्यात स्थान मिळवले. सध्या तो भारतीय सैन्याच्या १०१ फील्ड रेजिमेंटमध्ये नायब सूबेदार म्हणून कार्यरत असून सैन्याची जबाबदारी आणि क्रीडा कारकीर्द यांचा यशस्वी समतोल साधत देशासाठी सातत्याने पदके जिंकत आहे.
■ सर्वेशच्या यशाचा आनंद विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना कुशारे व पत्नी रोहिणी कुशारे यांचा मा.पं. समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे व माजी सरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी प्राचार्य दीपक चव्हाण, भास्कर बोचरे, रत्नाकर शिरसाठ, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, सचिन बोचरे, शांताराम ढवळे, सोमनाथ निळख, राजेंद्र पाटील, बापू तासकर, संभाजी डुकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेश कुशारे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, जिद्दीचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. सर्वेशच्या या ऐतिहासिक यशाचा संपूर्ण भारताला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
■ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वेश कुशारे यांचे अभिनंदन करत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताची मान जागतिक स्तरावर उंचावली असल्याचे नमूद केले. भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांनी सर्वेश यांना शुभेच्छा दिल्या.
■ काल मध्यरात्री सर्वेशने २.२५ मीटर उंच उडी मारत राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा होता. रात्रभर आम्ही आनंदोत्सव साजरा केला. देवगावच्या मातीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज भारताचा गौरव वाढवणारा ठरला आहे. त्याने आशियाई स्पर्धांमध्येही अशीच कामगिरी करत पुढील वेळी सुवर्णपदक जिंकावे, हीच आमची अपेक्षा आहे. अनिल कुशारे, सर्वेशचे वडील

No comments:
Post a Comment