आयुध निर्माणी वरणगांव सुरक्षा विभागाची सापळा रचत मोठी कारवाई; शस्त्र चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात!
प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : आयुध निर्माणी वरणगाव ही भारतीय शस्त्र व शस्त्रास्त्र निर्मिती उद्योगातील महत्वाची व अति संवेदनशील संस्था आहे. आयुध निर्माणीच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला नेहमीच आयुध निर्माणीच्या सुरक्षा यंत्रणेमार्फत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी वेळोवेळी अद्ययावत बदल देखील करण्यात आले आहेत. डीएससी जवान , खाजगी सुरक्षा रक्षक, दरबान इ. महत्वाच्या विविध ठिकाणी तैनात आहेत. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने विविध ऑपरेशन देखील वेळोवेळी राबवले गेले आहेत. आयुध निर्माणी वरणगावच्या प्रतिबंधित क्षेत्रात अवैध व संशयास्पद प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २३ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. यासंदर्भात निर्माणिचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल. इसाक नदाफ यांच्या अधिपत्याखाली सापळा रचून ‘ऑपरेशन घोरपड ‘अंतर्गत चोरीच्या हेतूने अनधिकृत प्रवेश करणाऱ्या निलेश बळीराम थाटे आणि राजेंद्र श्रीधर कोळी ( दोघेही रा. तळवेल, ता. भुसावळ) यांना पकडण्यात आले. यासंदर्भात अधिक वृत्त असे कि आयुध निर्माणिचा कारखाना परिसर हा सामान्य नागरिकांस प्रतिबंधित परिसर असून निर्माणीच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती व विविध ठिकाणी सुरक्षा चौकी उभारण्यात आल्या आहेत. संशयित निलेश बळीराम थाटे व राजेंद्र श्रीधर कोळी हे आयुध निर्माणी परिसरात बऱ्याच दिवसांपासून रेकी करीत असल्याचा व संशयास्पद वावर करीत असल्याचे निर्माणीच्या सुरक्षा यंत्रणेला जाणवले. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर निर्माणीचा सुरक्षा विभाग लक्ष ठेऊन होता. संशयित निलेश थाटे यास याधीही निर्माणीत २३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्मानीतील शस्रागारातून तीन एके ४७ व दोन ५.५६ गॅलील रायफल्सच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पुढे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस ) व स्थानिक पोलीस यंत्रणांनी केला होता. सदर संशयित हा मागील शस्त्रचोरी गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याने त्याच्या हातून देशविघातक कारवाया होण्याची शक्यता मोठी होती.
या धर्तीवर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळत सुरक्षाकर्मिंयाना आवश्यक निर्देश याआधीच दिले होते. २३ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घोरपड पकडण्याचा बहाणा करीत संशयित निलेश थाटे व राजेंद्र कोळी हे दोघे निर्माणीच्या संरक्षण भिंतीलागत असलेल्या सुरक्षा चौकी क्र. ६ व ७ मधील संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस संशयास्पद वावरत होते. ही बाब सुरक्षा विभागाच्या सीसीटीव्ही दृश्य नियंत्रण कक्षातील रक्षा कर्मचारी मिलिंदा पाटील यांच्या निदर्शनास आली. या घटनेची त्वरीत दखल घेत वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्या लष्करी नियोजन व मार्गदर्शनात डीएससी अधिकारी शेरबहादूर आले, लक्ष्मीनारायणन, खासगी सुरक्षा कर्मी कडू घुले, निलेश सोनटक्के, एस के चौधरी तसेच सुरक्षा अनुभाग चे अभिजित नंदी, धिरज तायडे, जितु वराडे, व शांताराम जोहर व क्यूआरटीचे जवान यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयिताना ताब्यात घेतले. या मोहिमेत विवेक कांबळे व एन एम झोपे यांनी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची व्यवस्था सांभाळली. संशयितांची सुरक्षा अधिका-यांनी चौकशी केली असता त्यांचा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशाचा हेतू, वर्तन व त्यांनी दिलेली उडवाउडवीची उत्तरे यात मोठी विसंगती आढळून आली.
संशयितांचांं संभावित चोरी, गैरकृत्य किंवा घातपात आदींचा हेतू लक्षात आल्याने आयुध निर्मानीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक अभिजित नंदी यांनी वरणगांव पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३२९ (३),३०३, ६२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्य महाप्रबंधक एम झेड सरवर यांचा संपर्क पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांशी झाला असून सदर गुन्ह्याचा तपास वरणगांव पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक अमितकुमार बागुल , पो.कॉ. सखाराम सावकारे, मनोहर बनसोडे आदि करीत आहेत. आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आयुध निर्माणी प्रशासनास संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि निर्माणीची सुरक्षा व्यवस्था भक्कम असून वेळेनुसार व गरजेनुसार आद्ययवत व आवश्यक सुरक्षा व्यवस्थापन अंमलात आणले जात आहे. ठिकठिकाणी उच्च दृश्यमान सीसीटीव्ही कॅमेरे , डीएससी जवान, खाजगी सुरक्षा रक्षक, दरबान यांची नियुक्ती, वेळोवेळी गस्त, संशयास्पद हालचालींवर देखरेख तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. दरम्यान निर्माणी वसाहत परिसरात याआधीच बाहेरून येणाऱ्या असामाजिक तत्वावर, अवैध वाहतूक व व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच निर्माणी परिसरात चुकीच्या गोष्टी घडत असल्यास आमच्या सुरक्षा विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक एम झेड सरवर व वरिष्ठ सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल. इसाक नदाफ यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment